मिशन आपुलकीतून लोकसहभागाने मोफत मल्लखांब प्रशिक्षणाचा शुभारंभ
दापोली : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती, एकाग्रता व आत्मविश्वास वाढविण्यासाठी दापोली तालुक्यातील जि.प.
केंद्रशाळा आसूद क्र. १ येथे मिशन आपुलकी अंतर्गत लोकसहभागातून मोफत मल्लखांब प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी शाळेत आयोजित शारदोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू करण्यात आला.
आसूद येथील त्रिवेणी संगम ग्रुपच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी मल्लखांब उपलब्ध करून देण्यात आला असून, मल्लखांब प्रशिक्षणही मोफत दिले जाणार आहे. श्री निकेत बांद्रे व श्री आयुष जांभळे हे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मल्लखांब या पारंपरिक क्रीडाप्रकाराचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.
प्रशिक्षणाच्या शुभारंभप्रसंगी त्रिवेणी संगम ग्रुपचे अध्यक्ष नंदकुमार बांद्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओंकार रेवाळे, मोहन जांभळे, कानसे गुरुजी, दिलीप बांद्रे, यशवंत बांद्रे, नंदकुमार जोशी , कल्पना जोशी, प्रशिक्षक श्री. शिंदे आणि संगीत प्रशिक्षक वरद दातार यांच्यासह ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मल्लखांब प्रशिक्षक आयुष जांभळे यांनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना या क्रीडाप्रकाराची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक क्षमता, संतुलन, चपळता आणि आत्मविश्वास विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लोकसहभागातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या त्रिवेणी संगम ग्रुपच्या योगदानाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक महेश गिम्हवणेकर, उपशिक्षक सचिन जगताप, शिक्षिका सौ. पल्लवी खडके आणि सर्व पालकवर्गाने मंडळाचे आभार मानले. शाळा आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेला हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.









