मंडणगड (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून उद्योग-व्यवसायाची ओळख व्हावी, त्यांच्यात उद्योजकतेची आवड निर्माण व्हावी आणि भविष्यात स्वावलंबनाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा देव्हारे येथील विद्यार्थ्यांनी कळकवणे येथील मिलिंद ॲग्रो काजू युनिटला क्षेत्रभेट दिली.
या भेटीदरम्यान युनिटचे मालक तथा उद्योजक मिलिंद पवार यांनी विद्यार्थ्यांना काजू प्रक्रिया उद्योगाची सविस्तर माहिती दिली. कच्च्या काजूपासून तयार उत्पादनापर्यंतच्या विविध प्रक्रिया, उद्योगाचे व्यवस्थापन, उत्पादनाचे नियोजन आणि व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक असणारे परिश्रम व कौशल्य यांची त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती करून दिली. ग्रामीण भागातही जिद्द, मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर यशस्वी उद्योग उभारता येतो, याचा प्रेरणादायी अनुभव विद्यार्थ्यांना या क्षेत्रभेटीतून मिळाला.
यावेळी शिक्षणप्रेमी तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, केंद्रप्रमुख रजनी जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेश घागरूम आणि उपाध्यक्ष दिनेश बोबले यांनी मिलिंद पवार यांच्या उद्योजकीय कार्याचे कौतुक केले. स्थानिक पातळीवर उद्योग उभारून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून प्रेरणा देण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
शिक्षण आणि उद्योग यांची सांगड घालणारी ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या विविध संधी समजण्यास आणि स्वतःच्या क्षमतांची जाणीव होण्यास मदत होते.
या वेळी शिक्षणप्रेमी तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, केंद्रप्रमुख रजनी जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेश घागरूम, उपाध्यक्ष दिनेश बोबले, मुख्याध्यापक भिकू बोर्ले, उपमुख्याध्यापिका विद्या पवार, पदवीधर शिक्षिका मनीषा ठोंबरे, पदवीधर शिक्षक नितेश हुंबरे, मिलिंद ॲग्रो काजू युनिटचे मालक मिलिंद पवार, निकिता पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तुषार करावडे, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.








