‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ संकल्पनेतून भूजल पातळी वाढविण्याचा प्रयत्न; पशु-पक्ष्यांसाठीही ठरतोय पाण्याचा आधार
मंडणगड (प्रतिनिधी) मंडणगड तालुक्यातील देव्हारे येथे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासह भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी जलसंधारणाचा उपक्रम हाती घेतला आहे. गेली अनेक वर्षे ते स्वतःच्या खर्चाने आणि जेसीबीच्या साह्याने ओढ्यावर बंधारे बांधत असून, यंदाही त्यांनी ओढ्यावर दुसरा बंधारा उभारला आहे. त्यांच्या या उपक्रमातून ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.
पावसाळा संपल्यानंतर ओढ्यांमधील पाण्याची पातळी हळूहळू कमी होऊ लागते. उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये, तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत मुरून भूजलसाठ्यात वाढ व्हावी, या उद्देशाने अभिजीत देवळेकर सातत्याने प्रयत्नशील आहेत.स्वतःच्या खर्चातून आणि जेसीबीच्या मदतीने ते ओढ्यावर बंधारे बांधण्याचे काम करतात. यंदा उभारण्यात आलेल्या दुसऱ्या बंधाऱ्यामुळे ओढ्यातील पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमाचे महत्त्व केवळ पाणी अडविण्यापुरते मर्यादित नाही. पावसाळ्यानंतर आणि उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची उपलब्धता कमी होत असताना ओढ्यात साठणारे पाणी पशुधनासह परिसरातील पशु-पक्ष्यांसाठीही उपयुक्त ठरू शकते. पाणी जमिनीत मुरल्यामुळे परिसरातील भूजलसाठ्याला मदत होण्याचीही अपेक्षा आहे. त्यामुळे जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि जीवसृष्टीला पाण्याचा आधार अशा विविध उद्देशांना या उपक्रमातून हातभार लागत आहे.
आज अनेक भागांत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असताना पावसाचे पाणी जतन करणे आणि त्याचा योग्य विनियोग करणे ही काळाची गरज बनली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा मानून अभिजीत देवळेकर यांनी गेली अनेक वर्षे सुरू ठेवलेला हा प्रयत्न स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करतो.
“पाणी अडवा, पाणी जिरवा; भूजलसाठा वाढवा आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आजपासूनच प्रयत्न करा,”हा संदेश देव्हारे येथील त्यांच्या उपक्रमातून पुढे येत आहे. वैयक्तिक पुढाकार, श्रम आणि स्वखर्चातून राबविलेल्या या कामामुळे जलसंधारणाबाबत जनजागृती होण्यासही मदत होत आहे.








