प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही
रत्नागिरी, दि. १२ :
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून रेल्वेने रत्नागिरीत येणाऱ्या जिल्हावासीयांकडून रेल्वे स्थानकावरून पुढे जाण्यासाठी काही रिक्षाचालकांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी घेतली. रिक्षांच्या जादा भाड्यावर उपप्रादेशिक परिवहन विभागाने नियंत्रण ठेवावे आणि जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव, मुख्याधिकारी वैभव गारवे आदी उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले. विविध विभागांचे अधिकारी तसेच जिल्हा शांतता समितीचे शासकीय व अशासकीय सदस्यही बैठकीला उपस्थित होते.
आगामी १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी व समितीचे अध्यक्ष मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गणेशोत्सव काळातील वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा, विसर्जन व्यवस्था, अतिक्रमण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत विविध सूचना देण्यात आल्या.
शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांचा त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील फुटपाथ मोकळे करणे, पकडण्यात आलेल्या जनावरांच्या संवर्धनासाठी योग्य नियोजन करणे, जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत आवश्यक परवानगी व्यवस्था करणे, तसेच ‘नो पार्किंग’सह महत्त्वाचे मार्गदर्शक फलक नागरिकांना स्पष्टपणे दिसतील अशा ठिकाणी लावण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
गणेशोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महावितरणने विशेष दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. गणपती विसर्जन स्थळांवर पुरेशी प्रकाशयोजना, सुरक्षा रक्षक तसेच आपत्कालीन परिस्थितीत बोटींची सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. विसर्जनाचे मार्ग आधीच निश्चित करण्याचे आदेशही देण्यात आले.
शांतता समितीच्या सदस्यांशी प्रशासनाचा अधिक चांगला ताळमेळ राहण्यासाठी त्यांना अधिकृत ओळखपत्रे देण्यासह स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्याची सूचनाही जिल्हाधिकारी जिंदल यांनी केली. आपत्कालीन तसेच आवश्यक माहितीची देवाणघेवाण जलदगतीने होण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करण्याचे त्यांनी सांगितले.








