श्री. अनिकेत सिकंदर कांबळे यांना रायगड पोलिसांकडून ‘जीवनदूत’ पुरस्कार
माणगाव : रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने मदत मिळावी, त्यांचे प्राण वाचावेत आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आधार मिळावा, या सामाजिक भावनेतून सातत्याने कार्य करणाऱ्या ‘शेलार मामा रेस्क्यू टीम, ताम्हिणी घाट, माणगाव’च्या कार्याची रायगड पोलीस प्रशासनाने दखल घेतली आहे.
रायगड पोलीस आयोजित ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत आयोजित ‘जीवनदूत सन्मान सोहळा २०२६’ मध्ये श्री. अनिकेत सिकंदर कांबळे, माणगाव यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘जीवनदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शेलार मामा रेस्क्यू टीमकडून गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्याचे कार्य सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून जखमींना मदत करणे, विनामूल्य रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे, आवश्यक औषधोपचारासाठी सहकार्य करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलिस प्रशासनाला मदतीचा हात देणे, अशी विविध समाजोपयोगी कामे टीमकडून केली जात आहेत.
विशेष म्हणजे, अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे पार्थिवही इच्छित स्थळी वेळेत पोहोचविण्यासाठी टीमकडून पोलिसांना सहकार्य केले जाते. कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव या भावनेतून सुरू असलेले हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
रस्ते अपघाताच्या प्रसंगी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. अशा वेळी मदतीसाठी तत्परतेने धावून जाणाऱ्या शेलार मामा रेस्क्यू टीममुळे अनेक गरजू नागरिकांना मोठा आधार मिळत आहे. त्यामुळे या कार्याची रायगड पोलिसांनी घेतलेली दखल आणि दिलेला ‘जीवनदूत’ पुरस्कार हा संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला आहे.
अलिबाग येथे झालेल्या या सन्मानामुळे श्री. अनिकेत सिकंदर कांबळे यांच्या सामाजिक कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, अपघातग्रस्तांच्या मदतीचे हे समाजोपयोगी कार्य यापुढेही अविरत सुरू राहणार असल्याची खात्री व्यक्त करण्यात आली.
या उल्लेखनीय कार्याबद्दल श्री. अनिकेत सिकंदर कांबळे तसेच संपूर्ण शेलार मामा रेस्क्यू टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.








