दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी, दि. ०६/०९/२०२६ रोजी रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सखी गटामार्फत आज लक्ष्मण उजल आणि अरुण उजल यांच्या शेतावर अझोल्ला उत्पादन तळ्याच्या उभारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. जनावरांसाठी पौष्टिक पूरक खाद्य म्हणून अझोल्लाचे महत्त्व गावकऱ्यांना समजावणे हा यामागील उद्देश होता.
प्रात्यक्षिकाची पद्धत:
१. ६ फूट लांब × ३ फूट रुंद × १ फूट खोल खड्डा खोदण्यात आला.
२. खड्ड्यात ताडपत्री अंथरून बाजू मातीने पॅक करून पाणी गळती बंद करण्यात आली.
३. तळ्यात ७ ते ८ इंच स्वच्छ पाणी भरले.
४. ३ किलो शेण, ३ किलो माती आणि ३० ग्रॅम एसएसपी खताची स्लरी तयार करण्यात आली.
५. ही स्लरी पाण्यात टाकून स्थिर होऊ दिली.
६. पाणी स्थिर झाल्यावर त्यात अझोल्ला बीज (कल्चर) सोडण्यात आले.
७. गोठ्याशेजारीच तळे तयार केल्याने यजमान शेतकऱ्यांना दररोज ताजे अझोल्ला जनावरांना देणे सोपे होणार आहे.
या प्रात्यक्षिकासाठी गावातील ११ ग्रामस्थ उपस्थित होते.
अझोल्लाचे फायदे:
अझोल्ला हे गाय-म्हशींसाठी अत्यंत पौष्टिक पूरक खाद्य आहे. यामुळे इतर खाद्यावरील खर्चात २० ते २५ टक्क्यांनी बचत होते आणि दुध उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्यास मदत होते. यात प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच याचा जैवखत आणि हिरवळीचे खत म्हणूनही शेतीत उपयोग होतो.
पाणी व्यवस्थापन:
प्रात्यक्षिकादरम्यान पाणी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्या कापणीनंतर २० ते ३० टक्के पाणी बदलावे आणि ३ ते ४ कापण्यांनंतर संपूर्ण पाणी बदलून पुन्हा स्लरी टाकावी, जेणेकरून अझोल्लाची वाढ चांगली राहील.
मार्गदर्शक:
हे प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुंकरकर, RAWE समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रभारी डॉ. विजय देसाई, विषय तज्ञ डॉ.नरेंद्र प्रसादे,आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण, डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
या प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात पौष्टिक पशुखाद्य निर्मितीचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळाले.








