भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने शाल-पुष्पगुच्छ देऊन कोळी बांधवांचा सन्मान
मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील वाल्मिकीनगर कोळीवाडा येथे नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांप्रती आपुलकी व्यक्त करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीच्या वतीने कोळी बांधवांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, पत्रकार उमेश तबीब आणि भाजपा मंडणगड शहराध्यक्ष आनंद नारकर यांच्या हस्ते कोळी बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी कोळी समाजाच्या समृद्ध पारंपरिक संस्कृतीचे तसेच समुद्राशी असलेल्या त्यांच्या अतूट नात्याचे कौतुक करत नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाच्या जीवनाशी आणि परंपरेशी घट्ट जोडलेला महत्त्वाचा सण आहे. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून सागरी जीवन सुरक्षित राहावे, सुख-समृद्धी लाभावी आणि व्यवसायात भरभराट व्हावी, अशी प्रार्थना करण्याची परंपरा आहे. या निमित्ताने कोळी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी बोलताना जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर म्हणाले, “समाजातील विविध घटकांशी आपुलकीचे नाते निर्माण करणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि त्यांच्या समृद्ध परंपरांचा सन्मान करणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने कोळी बांधवांचा सन्मान करण्याचा हा आनंदाचा क्षण आहे.”
या उपक्रमामुळे वाल्मिकीनगर कोळीवाड्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कोळी बांधव व महिलांनी शुभेच्छांचा स्वीकार करत आयोजकांचे आभार मानले.
यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, भाजपा मंडणगड शहराध्यक्ष आनंद नारकर, पत्रकार उमेश तबीब, वाल्मिकीनगर उपसरपंच विश्वजीत पाटील, केशव चोगले, नारायण रघुवीर, प्रभाकर तबीब, देवेंद्र पाटील, दिनेश पावशे, भारत तबीब, गणेश तबीब, लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कोळी बांधव व महिलावर्ग उपस्थित होते.








