बिबट्याच्या संचारामुळे नागरिक धास्तावले; वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
मंडणगड (प्रतिनिधी–उमेश तबीब) : मंडणगड तालुक्यातील देव्हारे–वडवली-आतले रस्त्यावर पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही याच परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला होता. आता पुन्हा बिबट्याची हालचाल दिसून आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
देव्हारे–वडवली-आतले हा मार्ग नागरिकांच्या दैनंदिन वर्दळीचा असून सकाळी तसेच सायंकाळच्या वेळेत या रस्त्यावर दुचाकीस्वार आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अशा वर्दळीच्या मार्गावर बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
बिबट्याच्या वाढत्या वावराची गांभीर्याने दखल घेऊन वनविभागाने संबंधित परिसराची तातडीने पाहणी करावी. तसेच बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त वाढवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
परिसरात बिबट्याचा वावर असल्याने वनविभागाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देऊन आवश्यक ती जनजागृती करणेही गरजेचे आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांनी एकट्याने प्रवास करणे टाळावे आणि बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात एखादी अनुचित घटना घडण्यापूर्वीच वनविभागाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा देव्हारे, वडवली-आतले परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.








