मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील वाल्मिकीनगर येथील कोळी समाजबांधव तसेच ‘महाराष्ट्र न्यूज’चे संपादक आणि ‘चालुवार्ता’, ‘अक्षराज’ व ‘बाळकडू’ या वृत्तपत्रांचे मंडणगड तालुका प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार उमेश तबीब यांचा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीच्या वतीने नारळीपौर्णिमेनिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते पत्रकार उमेश तबीब यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करण्यात आले.यावेळी अभिजीत देवळेकर म्हणाले की, ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, सामाजिक समस्या, विविध विकासकामे, सामाजिक उपक्रम तसेच स्थानिक घडामोडींना सातत्याने प्रसिद्धी देत समाजाचा आवाज प्रभावीपणे माध्यमांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य पत्रकार उमेश तबीब करीत आहेत. निर्भीड, निष्पक्ष आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यात स्थानिक पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.पत्रकारिता ही समाजाचा आरसा असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रभावी माध्यम आहे. समाज आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून पत्रकारांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची दखल घेत नारळीपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर उमेश तबीब यांचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, भाजपा मंडणगड शहराध्यक्ष आनंद नारकर, वाल्मिकीनगर उपसरपंच विश्वजीत पाटील, केशव चोगले, नारायण रघुवीर, प्रभाकर तबीब, देवेंद्र पाटील, दिनेश पावशे, भारत तबीब, गणेश तबीब, लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कोळी समाजबांधव व महिलावर्ग उपस्थित होता.








