गुणवंत अभियंत्याची शैक्षणिक भरारी; अभिजीत देवळेकर यांच्याकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन
मंडणगड (प्रतिनिधी-) : मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर मंडणगड येथील होतकरू व गुणवंत अभियंता विक्रांत चव्हाण यांनी एम.टेक. पदवी संपादन करून आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करत मनःपूर्वक अभिनंदन केले.
विक्रांत चव्हाण यांनी उच्च शिक्षणाची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करताना आपल्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातही केला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगशी संबंधित विविध कामांमध्ये त्यांचे तांत्रिक मार्गदर्शन आणि सहकार्य अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती ही केवळ वैयक्तिक यश नसून मंडणगडमधील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना अभिजीत देवळेकर म्हणाले, “विक्रांत चव्हाण यांनी उच्च शिक्षणाची उंची गाठतानाच आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी केला आहे, ही बाब विशेष कौतुकास्पद आहे. त्यांचे ज्ञान, अनुभव आणि यश निश्चितच समाजातील तरुणांना प्रेरणा देणारे आहे. भविष्यात त्यांनी आपल्या क्षेत्रात आणखी मोठे यश संपादन करावे, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”
एम.टेक. पदवी मिळवून विक्रांत चव्हाण यांनी मंडणगडच्या शैक्षणिक व तांत्रिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी भाजपा मंडणगड तालुका अध्यक्ष दत्ता महाडिक, सरचिटणीस यश मेहता, तालुका महिला आघाडी अध्यक्षा श्रेया दळवी, सोशल मीडिया संयोजक वैभव नारकर, वरिष्ठ पत्रकार विजय जोशी, तालुका चिटणीस सुप्रेश आंबेकर, शहराध्यक्ष आनंद नारकर, साक्षी आंबेकर, अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष दाभिळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.








