कै. कृष्णा मामा महाजन प्रतिष्ठानचा उपक्रम; उद्योगपती मिहीर महाजन, जि. प.सदस्य साधना महाजन यांचा पुढाकार
दापोली प्रतिनिधी
कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या वतीने कोळथरे येथे आंबा-काजू नुकसान भरपाईसाठी आवश्यक असलेल्या e-KYC आणि प्रधानमंत्री पिकविमा नोंदणी शिबिराचे गुरुवारी आयोजन करण्यात आले. परिसरातील तसेच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आयोजित या शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. यासाठी उद्योगपती मिहीर महाजन व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य साजरा महाजन यांनी शेतकऱ्यांना ही सुविधा मिळावी यासाठी पुढाकार घेतला आहे.
कोकणातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीबाबत शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत मिळविण्यासाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांनी e-KYC पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, नेटवर्कच्या अडचणी व इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांची ही प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाच्या सहकार्याने कोळथरे येथील आई आनंदी गोपाळ महाजन विद्यामंदिर प्रशालेमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या साधना महाजन, कृषी विभागीय अधिकारी मंचरे, जाधव, विद्याधर जोशी, ओंकार कात्रे, कौस्तुभ वैद्य, आदित्य देपोलकर, सिद्धी मयेकर, सुनील पेठे, अमेय हुंबरे, शाळेचे मुख्याध्यापक मंगेश नरवणकर, प्रशांत जाधव तसेच प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन आदी उपस्थित होते.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी कोळथरे, पंचनदी, गोमराई, आघारी, उसगाव, बोरिवली आदी गावांतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या साधना महाजन यांनी आंबा-काजू नुकसान भरपाईचे महत्त्व अधोरेखित करत राज्यातील महायुती सरकार कोकणातील शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याचे सांगितले. वर्षभर मेहनत घेऊन उभे केलेले पीक नुकसानग्रस्त झाल्यानंतर शासनाकडून मिळणारी मदत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.










