दापोली : जालगाव ग्रामपंचायतीच्या वतीने अक्षय प्रतिष्ठान आणि यश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने जालगाव येथे रविवारी, १६ ऑगस्ट २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध आरोग्यविषयक समस्यांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व प्राथमिक तपासणी सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर जालगाव नं. २ येथील आदर्श केंद्र शाळेत सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. शिबिरामध्ये विविध वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करून आजारांचे निदान, उपचाराबाबत मार्गदर्शन तसेच आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे.
शिबिरामध्ये डॉ. कनक वणकर (M.B.B.S., DNB Medicine, FCCM) यांच्याकडून हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंड व रक्तदाबाशी संबंधित समस्या, पोषण व आतड्यांचे विकार, किडनी स्टोन, प्रोस्टेट ग्रंथीशी संबंधित समस्या, हृदयविकार तसेच सतत फिट येणे व दम्याच्या तक्रारींबाबत तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे.
स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. भाऊसाहेब काटकर (M.B.B.S., D.G.O.) यांच्याकडून महिलांच्या विविध आरोग्य समस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. किशोरवयीन मुलींच्या समस्या, मासिक पाळीशी संबंधित तक्रारी, वंध्यत्व, गर्भाशयाशी संबंधित आजार, गर्भाशयाच्या तपासणीसह स्तनांच्या आजारांबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निखील मिसाळ (M.B.B.S., D.Ortho) यांच्याकडून लहान मुलांच्या हाडांच्या समस्या, सांधे व मणक्यांचे विकार, हाडांच्या दुखापती, न-जुळलेली किंवा वाकडी झालेली हाडे, गुडघेदुखी, कंबरदुखी आदी समस्यांवर तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच नेत्रतज्ज्ञ डॉ. फाल्गुनी जपे (MBBS, MS) यांच्याकडून नागरिकांची मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे. मोतीबिंदूचे निदान, चष्म्याचा नंबर तपासणे, संगणकाद्वारे नेत्र तपासणी, काचबिंदू तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी विशेष नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास पुढील उपचार व शस्त्रक्रियेबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिरामध्ये तपासणी करून घेणाऱ्या नोंदणीकृत रुग्णांना यश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या चाचण्यांवर ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासणीसोबत आवश्यक वैद्यकीय चाचण्यांचा लाभही सवलतीच्या दरात घेता येणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांनी आरोग्याच्या किरकोळ वाटणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करून घ्यावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जालगाव ग्रामपंचायत, अक्षय प्रतिष्ठान आणि यश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दापोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.








