कर्तव्यनिष्ठ व सेवाभावी कार्याचा गौरव; अभिजीत देवळेकर यांच्याकडून शाल-पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा
मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील देव्हारे येथील ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील यांचा वाढदिवस मंडणगड येथील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन अमोल पाटील यांचा सन्मान करत त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अभिजीत देवळेकर यांनी अमोल पाटील यांच्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक केले. ग्राम महसूल अधिकारी म्हणून काम करताना नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे तसेच महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक सहकार्य करणे, ही जबाबदारी ते जबाबदारीने पार पाडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“शासकीय सेवेत कार्यरत असताना केवळ प्रशासकीय जबाबदारी पार पाडणे पुरेसे नसून, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याची भावना महत्त्वाची असते. प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि सेवाभाव या गुणांमुळेच जनतेचा विश्वास संपादन करता येतो. अमोल पाटील यांची पुढील वाटचाल अशीच यशस्वी आणि समाजोपयोगी ठरो,” अशा शब्दांत अभिजीत देवळेकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी अमोल पाटील यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि प्रशासकीय सेवेत उत्तरोत्तर यश लाभावे, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. सहकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या वाढदिवस सोहळ्यामुळे आनंददायी वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, कुंबळेचे ग्राम महसूल अधिकारी उद्धव घाटूळ, उन्हवरेचे ग्राम महसूल अधिकारी नयन बोबडे, पालवणीचे ग्राम महसूल अधिकारी रतन साळुंखे आणि पाचरळचे ग्राम महसूल अधिकारी रमेश बर्दापुरे उपस्थित होते.








