मंडणगडसह उत्तर रत्नागिरीतील गरजू रुग्णांना मोलाचा आधार; रुग्णसेवेच्या कार्याचे कौतुक
मंडणगड (प्रतिनिधी) :
राजकारणापेक्षा रुग्णसेवा श्रेष्ठ मानून गरजू रुग्णांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते हे अनेक रुग्णांसाठी आरोग्यदूत ठरत आहेत. डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांना मार्गदर्शन करणे, आवश्यक कागदपत्रांसाठी सहकार्य करणे आणि पात्र रुग्णांना आर्थिक सवलती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, असे त्यांचे सेवाभावी कार्य सुरू आहे.
नुकतेच मंडणगड तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते आकाश नाविलकर यांनी एका आपत्कालीन रुग्णाला वालावलकर रुग्णालयात पाठवले होते. या रुग्णाला आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी मंगेश मोहिते यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मोहिते यांनी तत्परतेने रुग्णाची विचारपूस करून आवश्यक सहकार्य केले.
पदापेक्षा माणुसकी मोठी आणि राजकारणापेक्षा रुग्णसेवा श्रेष्ठ, या भावनेतून कार्य करणाऱ्या मंगेश मोहिते यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक होत आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक गरजू रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोलाचा आधार मिळत असल्याचे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी, जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी सांगितले.








