दापोली प्रतिनिधी
आषाढी एकादशीचे औचित्य साधून सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणी येथे “ज्ञानाच्या दारी : विठू माऊलीची वारी” हा सांस्कृतिक व भक्तिमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन श्री. सुजय मेहता सर , राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा आणि नगरसेविका दापोली सौ. साधना बोत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस सौ. प्रिती जैन, एस.एम.सी. सदस्य सौ. नेहा मेहता तसेच सौ. मीनल मेहता उपस्थित होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रितू मेहता मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे चेअरमन श्री. सुजय मेहता सर यांच्या हस्ते पादुकापूजनाने झाली. त्यानंतर शाळेच्या परिसरातून पारंपरिक दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम” व “जय हरी विठ्ठल”च्या नामघोषात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
दिंडीदरम्यान पारंपरिक रिंगण सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीची पूजा व आरती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंगगायनाने वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. वारकरी परंपरेचे महत्त्व आणि संतांच्या विचारांचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख झाली तसेच भक्ती, एकता आणि संस्कार यांचे महत्त्व अनुभवता आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. रितू मेहता मॅडम, शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.









