मंडणगड (विशेष प्रतिनिधी)
देव्हारे हायस्कूलसमोर मुंबई-पुणे एस.टी. बसेसना नियमित थांबा देण्याची मागणी,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांचे मंडणगड आगारव्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे
मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील देव्हारे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबई व पुणे आगारातून येणाऱ्या एस.टी. बसेसना विद्यालयाच्या अधिकृत बसथांब्यावर नियमित थांबा देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मंडणगड आगार व्यवस्थापकांकडे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
देव्हारे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असून, ये-जा करण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात एस.टी. बससेवेचा वापर करतात. विद्यालयाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अधिकृत बसथांबा उपलब्ध असतानाही मुंबई व पुणे आगाराच्या काही एस.टी. बसेस या ठिकाणी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना देव्हारे एस.टी. स्टँडवर उतरून विद्यालयापर्यंत मोठ्या अंतराची पायपीट करावी लागत आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात वेळेवर पोहोचण्यास अडचणी येत असून, त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जात आहे. विशेषतः पावसाळ्यात विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, वेळेची बचत आणि सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबई व पुणे आगाराच्या संबंधित सर्व एस.टी. बसेसना देव्हारे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अधिकृत बसथांब्यावर नियमानुसार नियमित थांबा देण्याच्या सूचना संबंधित चालक व वाहकांना देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच सर्व संबंधित चालक व वाहकांना बसथांब्याबाबत स्पष्ट सूचना देऊन विद्यार्थ्यांची गैरसोय तातडीने दूर करावी, अशीही विनंती करण्यात आली.
हे निवेदन देताना भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, मंडणगड तालुका अध्यक्ष दत्ता महाडीक तसेच अनुसूचित जाती मोर्चा, मंडणगड तालुका अध्यक्ष संतोष दाभिळकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा व सुरक्षिततेचा विचार करून या मागणीवर एस.टी. महामंडळाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.








