मंडणगड विशेष प्रतिनिधी
मंडणगड तालुक्यातील देव्हारे-देवरहाटी येथे संत रोहिदास महाराज समाज मंदिरासाठी जागा देण्याची मागणी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांचे मंडणगड तहसीलदार यांच्याकडे निवेदन
मंडणगड (प्रतिनिधी) : देव्हारे-देवरहाटी येथील सर्व्हे नं. ३ मधील शासनाच्या उपलब्ध जागेपैकी नियमानुसार योग्य जागा संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या समाज मंदिरासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीच्या वतीने मंडणगड तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
संत शिरोमणी रोहिदास महाराज यांनी समाजाला समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक एकोपा यांचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच समाजबांधवांच्या धार्मिक व सामाजिक भावनांचा विचार करून देव्हारे-देवरहाटी येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे समाज मंदिर उभारण्याचा मानस असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर समाज मंदिरासाठी देव्हारे-देवरहाटी येथील सर्व्हे नं. ३ मधील शासनाच्या उपलब्ध जागेपैकी नियमानुसार योग्य जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या समाज मंदिराच्या माध्यमातून संत रोहिदास महाराज यांच्या समता, सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि मानवतेच्या विचारांचा समाजामध्ये प्रचार व प्रसार करण्यास मदत होणार आहे.
तसेच समाज मंदिराच्या माध्यमातून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील सर्व घटकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचे नियोजन असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित जागेची पाहणी करून आवश्यक ती शासकीय प्रक्रिया पूर्ण करावी आणि समाज मंदिरासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी, अशी विनंती तहसीलदारांकडे करण्यात आली.
या निवेदनावर सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्व्हे नं. ३ मधील शासनाच्या जागेपैकी नियमानुसार योग्य जागा संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या समाज मंदिरासाठी उपलब्ध करून देण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन देताना भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, मंडणगड तालुका अध्यक्ष दत्ता महाडीक तसेच अनुसूचित जाती मोर्चा, मंडणगड तालुका अध्यक्ष संतोष दाभिळकर उपस्थित होते.
संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार तसेच समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी समाज मंदिराची आवश्यकता असून, प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.








