विद्यार्थी,महिला, जेष्ठ नागरिकांचे पावसात अतोनात हाल
लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
सिंधुदुर्ग / कणकवली
मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव पटेलवाडी येथील प्रवासी निवारा शेड गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत आहे. त्यामुळे प्रवाशांना उन्हात तसेच पावसात उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागत असून यामुळे प्रवासी वर्ग व ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याचा फटका शाळेत जाणारे विद्यार्थी जेष्ठ नागरिक महिला यांनाही बसत आहे मात्र याकडे संबंधित लोकप्रतिनिधींचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. यामुळे ऐन पावसाळ्यातही हे हा सुरू आहेत उन्हाळ्यातही भर उन्हात उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर येते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
पटेलवाडी येथील जुना बसथांबा रद्द करून प्रवाशांच्या सोयीचा विचार न करता चुकीच्या ठिकाणी प्रवासी निवारा शेड उभारण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित शेडची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, त्याकडे संबंधित यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
‘उघडा डोळे, बघा नीट’ अशी संतप्त भावना
महामार्गावरील विविध विकासकामांच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, अनेक ठिकाणी प्रवासी निवारा शेड नादुरुस्त झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने ‘उघडा डोळे, बघा नीट’ अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या शेडची योग्य देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने त्याचा फटका महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तातडीने पाहणी करून पटेलवाडी येथील प्रवासी निवारा शेडची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दुरुस्ती न झाल्यास आवाज उठविण्याचा इशारा
मुंबई-गोवा महामार्गावरील नादुरुस्त प्रवासी निवारा शेडची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. प्रवाशांच्या सुरक्षेकडे व सुविधांकडे यापुढेही दुर्लक्ष केल्यास संबंधित यंत्रणेविरोधात ग्रामस्थ व प्रवासी वर्गाच्या वतीने तीव्र आवाज उठविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
प्रवाशांच्या हितासाठी उभारण्यात आलेल्या सुविधा केवळ कागदावर न राहता त्यांची नियमित देखभाल होणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी याकडे तातडीने लक्ष देऊन प्रवासी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांकडून केली जात आहे.










