दापोली प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील करंजगाव येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणी येथे नशामुक्त भारत अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या ब्रम्हकुमारी सारीका आणि बम्हकुमारी विद्या या प्रतिनिधींची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना तंबाखू, सिगारेट, मद्यपान व इतर अमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले. निरोगी जीवनशैली, सकारात्मक विचार, आत्मसंयम आणि चांगले संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून आपल्या कुटुंबीय व समाजामध्येही जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत “Say No To Drugs, Yes To Life” हा संदेश देत व्यसनमुक्त भारत घडविण्याची शपथ घेतली. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण झाली.
संस्थेचे चेअरमन सुजय मेहता , मुख्याध्यापिका रितू मेहता मॅडम यांनी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या प्रतिनिधींचे विशेष योगदान लाभले.








