रत्नागिरी – “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६” अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. असे आवाहन सहकारी संस्थां जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
आधार प्रमाणीकरणासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकाची यादी २४ जुलै २०२६ रोजी प्राप्त झाली असून, ती गावोगावी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कुठे पाहता येईल पात्र शेतकऱ्यांची यादी?
- संबंधित ग्रामपंचायत कार्यालय
- विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव/संस्थेचे कार्यालय
- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा
ॲग्रीस्टॅक नोंदणी (Farmer ID) बंधनकारक
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी क्रमांक (फार्मर आयडी) असणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही नोंदणी केलेली नाही, त्यांनी तत्काळ नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर जाऊन नोंदणी करून घेणे बंधनकारक असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया आणि सुविधा
कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी यादीतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा ‘महा ई-सेवा केंद्र’ येथे स्वतः उपस्थित राहून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.
या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून, जिल्हा प्रकल्प कार्यालय, महाआयटी (MahaIT), रत्नागिरी यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व सेवा केंद्रांना आधार प्रमाणीकरणाबाबतचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे.
तसेच, या प्रक्रियेची सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे (SOP) सर्व ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी कोणत्याही विलंबाशिवाय नजीकच्या केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.






