दापोली प्रतिनिधी : पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन सायबर फसवणुकीतील पैसे स्वीकारण्यासाठी आणि ते पुढे हस्तांतरित करण्यासाठी बँक खात्याचा गैरवापर केल्याप्रकरणी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीत हा ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार घडला असून, १९ जुलै २०२६ रोजी रात्री ९:३२ वाजता दापोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सायबर विभागाकडून जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकाच्या हद्दीतील अशा स्वरूपाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाली आहे. म्युअल अकाउंट अंतर्गत आपले खाते दुसऱ्याला वापरण्यास देऊन कमिशन घेणे हा नवा फंडा यामुळे समोर आला आहे. या सगळ्याची गंभीर दखल केंद्र व राज्य शासनाच्या सायबर सेलने घेतली आहे. अशा स्वरूपाचे आणखी काही अन्य खातेधारकांचे संशयास्पद अकाउंट रत्नागिरी,चिपळूण, राजापूर,मंडणगड, दापोली तालुक्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हाभरात असे काही संशयास्पद अकाउंट आहेत त्यांची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे त्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
दापोली पोलीस ठाण्यातील असंतोष गणपत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तपासादरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका खात्याचा वापर देशभरात घडलेल्या ऑनलाईन सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमधील बेकायदेशीर रक्कम स्वीकारण्यासाठी करण्यात आल्याचे समोर आले. संबंधित खातेदाराने ही रक्कम स्वतःच्या खात्यात जमा करून घेऊन ती पुढे इतर खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी आपल्या साथीदारांना परवानगी दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात स्टेट बँकेचा संबंधित खातेदार आणि त्याचा एक अनोळखी साथीदार यांच्यावर संशय असून दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अद्याप या गुन्ह्यात कोणालाही अटक झालेली नाही.








