दापोली प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील सोवेली येथे कुणबी सेवा संघ, दापोलीच्या नवभारत छात्रालय परिवार आणि अश्विनी ॲग्रो फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने कोकम, काळीमिरी व चिकू यांच्या रोपे-कलमांचे मोफत वाटप तसेच फळबाग लागवडीविषयी मार्गदर्शन कार्यक्रम सुतारवाडी, सोवेली येथील देवळात आयोजित करण्यात आला होता. कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत कार्यरत वसुंधरा व मृदगंध गटाच्या कृषी विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य श्री. राजेंद्र फणसे, सोवेली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. जयेश मानकर, कुणबी सेवा संघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, सदस्य डॉ. राजन खांडेकर, सरचिटणीस श्री. हरिश्चंद्र कोकमकर, रावे केंद्रप्रमुख डॉ. विजयकुमार देसाई, रावे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे तसेच उमेदच्या सी.आर.पी. सौ. रूपाली सोविलकर उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. प्रभाकर शिंदे यांनी गेली बारा वर्षे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व शेतकऱ्यांमध्ये फळबाग लागवडीविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबवित असल्याचे सांगितले. कोकम आणि काळीमिरी या पिकांमध्ये कोकणातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याची मोठी क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वतःच्या यशस्वी अनुभवांची उदाहरणे देत त्यांनी शेतकऱ्यांना आंबा व काजू बागांबरोबरच कोकम बागांची लागवड करण्याचे तसेच “झाड तिथे काळीमिरी” हा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. काळीमिरीची शास्त्रोक्त लागवड, व्यवस्थापन व उत्पादनवाढीबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. राजन खांडेकर यांनी कोकम लागवडीचे तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापन, उत्पादन क्षमता आणि बाजारपेठेच्या संधी याविषयी सविस्तर माहिती दिली.
नवभारत छात्रालय परिवाराचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी कुणबी सेवा संघाच्या विविध सामाजिक व कृषीविषयक उपक्रमांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
सोवेली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. जयेश मानकर यांनी कुणबी सेवा संघ आणि अश्विनी ॲग्रो फार्म यांचे आभार मानून गावातील शेतकरी वितरित करण्यात आलेल्या रोपे-कलमांची लागवड करून त्यांचे योग्य व्यवस्थापन करतील, असा विश्वास व्यक्त केला. रावेच्या कृषी विद्यार्थिनींमुळे हा उपक्रम सोवेली येथे आयोजित करणे शक्य झाल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले.
पंचायत समिती सदस्य श्री. राजेंद्र फणसे यांनी हा उपक्रम गावात राबविल्याबद्दल आयोजक संस्थांचे आभार मानले. भविष्यात कोकम व काळीमिरीसारख्या आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच अशा प्रकारचे कृषी जनजागृतीचे उपक्रम सातत्याने गावात आयोजित व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात नवभारत छात्रालय परिवारामार्फत प्रत्येक लाभार्थ्यास चार कोकम रोपे, तर अश्विनी ॲग्रो फार्ममार्फत दोन काळीमिरीची रोपे आणि एक चिकू कलम मोफत वितरित करण्यात आले. यावेळी कलमांची शास्त्रीय पद्धतीने लागवड कशी करावी याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कोकम व काळीमिरी लागवडीतील योग्य अंतर, खड्ड्यांचा आकार, सेंद्रिय खतांचा वापर, सिंगल सुपर फॉस्फेटचा उपयोग तसेच वाळवी प्रतिबंधक उपाययोजनांविषयी प्रत्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण झगडे यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकऱ्यांना रोपे-कलमांचे वितरण करण्यात आले. या नाविन्यपूर्ण, उपयुक्त आणि शैक्षणिक उपक्रमामुळे सोवेली परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रावे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दृकश्राव्य प्रमुख श्री. श्रीयश पवार, वसुंधरा गटाच्या जान्हवी थळे, साक्षी यादव, मानसी कोड्या, श्रुती जगताप , प्रज्ञा राऊळ, पूजा, अनुश्री, दीक्षिता, तसेच मृदगंध गटाच्या सोनाली कोंडिलकर, समृद्धी पाटील, मयुरी मिसाळ, नम्रता सावंत, दिक्षा पोटे, श्रेया नाईक, भूमी चिबडे, वैष्णवी जाधव, वैष्णवी सुर्वे आणि पूर्वा कुरूळकर या कृषी विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये रावेच्या कृषी विद्यार्थिनींचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले. त्यांनी सोवेली गावात या उपक्रमाविषयी जनजागृती करून इच्छुक शेतकऱ्यांची यादी तयार केली, ती आयोजक संस्थेकडे सादर केली तसेच त्यानुसार रोपे-कलमे गावात उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक समन्वय साधला. तसेच त्यांनी कार्यक्रमापूर्वी शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमस्थळी नोंदणी, नियोजन, प्रात्यक्षिकांचे समन्वयन तसेच कार्यक्रमानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना रोपे-कलमांचे शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने वाटप करण्याची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सुरळीत व प्रभावीपणे पार पडले.







