‘कृषी स्नेही’ समूहातर्फे वणोशी तर्फ पंचनदी येथील देऊळवाडी येथे उपयुक्त व उपद्रवी कीटकांवरील प्रात्यक्षिक
दापोली प्रतिनिधी
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत ‘कृषी स्नेही’ समूहाच्या विद्यार्थिनींनी दापोली तालुक्यातील वणोशी तर्फ पंचनदी येथील देऊळवाडी येथे “उपयुक्त व उपद्रवी कीटक” या विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला.
शेतातील पिकांचे परागीभवन, उपद्रवी किडींचे नैसर्गिक नियंत्रण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात मधमाशी, लेडीबर्ड भुंगा, हिरवा लेसविंग, व्याधपतंग, मुंगी व कोळी या मित्रकीटकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. या मित्रकीटकांचे शेतीतील महत्त्व व त्यांचे संवर्धन करण्याची गरज उपस्थितांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आली. तसेच भात पिकावरील खोडकिडा, तपकिरी तुडतुडे, लष्करी अळी व निळे भुंगेरे, आंबा पिकावरील मोहोर तुडतुडे व फळमाशी तसेच नारळ पिकावरील गेंडाभुंगा या उपद्रवी किडींची ओळख, त्यांच्या प्रादुर्भावाची लक्षणे तसेच प्रभावी नियंत्रण उपाय याविषयी पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान मधमाशी, फळमाशी व मुंगी यांसारख्या जिवंत कीटकांचे नमुने उपस्थितांना दाखविण्यात आले. विद्यार्थिनींनी प्रत्येक कीटकाची ओळख, त्याचे शेतीतील महत्त्व तसेच उपयुक्त व उपद्रवी कीटकांमधील फरक सोप्या व प्रभावी पद्धतीने स्पष्ट केला. त्यामुळे उपस्थितांना कीटकांची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भाजीपाला पिकांवरील पीठ्या ढेकूण यांच्या व्यवस्थापनाबाबत तसेच साठवणुकीतील धान्यावरील सोंडे किडीच्या नियंत्रणाबाबत विविध प्रश्न विचारण्यात आले. विद्यार्थिनींनी या प्रश्नांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने निरसन करून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन केले.
या प्रात्यक्षिकामुळे उपयुक्त व उपद्रवी कीटकांची ओळख, त्यांचे कृषी क्षेत्रातील महत्त्व तसेच शाश्वत व पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापनाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समृद्धी जाधव, नीलम मदने, तन्वी श्रुती बोबडे, कु. साक्षी लोके, अंकिता मुंज, सलोनी सावंत, कोमल झिरवाळ, श्रावणी मोरे व आकांक्षा गाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रात्यक्षिक कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. समीर काळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम घेण्यात आला










