मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
दापोली (प्रतिनिधी):
रामराजे महाविद्यालय, दापोली आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने २१ आणि २२ जुलै २०२६ रोजी दोन दिवसीय मोफत नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरासाठी ‘इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल, खेड’ (Infigo Eyecare Hospital) येथील तज्ज्ञ पथकाने उपस्थित राहून सर्वांची नेत्र तपासणी केली. यामध्ये कृतिक तावडे, तुकाराम अडुळकर, अजय सावंत, मंदार मुकनाक व स्नेहा माने या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांनी आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने उपस्थितांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करून आवश्यक त्या वैद्यकीय सूचना व मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वेदिका राणे, वरिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. जालिंदर पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष येसावरे तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. अंकिता दळवी प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधींनीही या शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवला.
उत्स्फूर्त प्रतिसाद
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि संगणकाचा वाढता वापर लक्षात घेता डोळ्यांची निगा राखणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हीच बाब ओळखून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या शिबिरात महाविद्यालयातील ४५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. विद्यार्थ्यांसोबतच प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.










