रत्नागिरी:- सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2026 योजनेत सहभागी होण्याकरिता शेवटचे 7 दिवस शिल्लक म्हणजेच सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषि अधिकारी तसेच कृषी विभागाशी संपर्क साधावा. जिल्ह्याकरिता विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी आदित्य गुरव असून, त्यांचा संपर्क क्र. 8208531799 असा आहे. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेवटचे 7 दिवस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या पिकाचा विमा काढून घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC ), आपले सरकार सेवा केंद्राच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेवू शकता. www.pmfby.gov.in या पोर्टल वर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आजअखेर जिल्ह्यातील 789 शेतकऱ्यांनी 205 हेक्टर क्षेत्राकरिता सहभाग नोंदविला आहे.
विविध नैसर्गिक आपत्ती, या वर्षीचे अल-निनोचे संकट, विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव व कमी उत्पादन आल्याने मिळणारे पीक संरक्षण मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घ्यावा.
खरीप हंगामात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भात व नाचणी या अधिसूचित पिकांसाठी 83 महसूल मंडळांमध्ये राबविण्यात येत आहे. विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी योजना कार्यरत आहे. यंदा राज्यामध्ये अल-निनोचे संकट असून यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करणे गरजेचे असून आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांचा पिक विमा योजनेत सहभागास प्राधान्यक्रम असला पाहिजे.
सदर योजना जिल्हयातील ८३ महसूल मंडळकरिता भात व नाचणी पिकासाठी लागू आहे. सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक, कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र, नोंदणीकृत भाडेकरार पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक, योजनेत सहभाग घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक असणे अनिवार्य आहे. शेतकरी विमा हप्ता- खरिप हंगामासाठी २ टक्के आणि जोखीमस्तर – अधिसूचित पिकासाठी ७० टक्के, योजनेत शेतकरी सहभागासाठी प्रति अर्ज किमान 0.10 हेक्टर क्षेत्राची मर्यादा आहे.
पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजनेत भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणेबाबत लेखी कळविणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयंघोषणा पत्र घेवून प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून व हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोहोच पावती त्याने जपून ठेवावी.
विमा संरक्षणाच्या बाबी – योजनेंतर्गत खरीप व रब्बी हंगामकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे/तांत्रिक उत्पादन आधारे, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील. उदा. ऑक्टोबर २०२५ मध्ये पीक काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आल्याने पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली होती.त्यामुळे यावर्षी अशा पद्धतीने विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनामध्ये घट झाल्यास पीक विमा संरक्षण असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते. एखाद्या शेतकऱ्याने ०.१० हे भात क्षेत्राकरिता पीक विमा काढण्यासाठी रक्कम 65 रुपये भरल्यास विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनामध्ये घट झाल्यास त्याला रक्कम 6 हजार रुपये नुकसानभरपाई मिळू शकते.
शेतकऱ्यांनी डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत ई-पीक पाहणी नोंद करणे बंधनकारक राहील. विमा योजनेत विमा घेतलेल्या पिकात आणि ई पिक पाहणी मध्ये नोंदविलेल्या पिकात काही तफावत आढळल्यास ई पिक पाहणीमध्ये नोंदविलेले पिक अंतिम गृहीत धरण्यात येईल.
योजनेत समाविष्ट पिके खरीप हंगाम भात व नाचणी आहे. नियुक्त केलेली कंपनी- इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी ली. इमेल आय डी – supportagri@iffcotokio.co.in विमा हफ्ता दर – शेतकरी हिस्सा भात- 650 रुपये प्रती हे, नाचणी- 400 रुपये प्रती हेक्टर







