दापोली प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशनतर्फे डॉ. प्रशांत अशोक परांजपे यांना ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर होत असलेला हा सन्मान दापोलीसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
हा पुरस्कार गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत पुणे येथील पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, घुले रोड, छत्रपती शिवाजीनगर येथे आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षण, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून डॉ. परांजपे यांनी समाजासाठी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. परांजपे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण क्षेत्रातील संस्था, मान्यवर तसेच नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे दापोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, पर्यावरण व सामाजिक कार्य करणाऱ्या तरुणांसाठीही त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.









