सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणी येथे “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियान
दापोली प्रतिनिधी
सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणी येथे महाराष्ट्र शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आरोग्य विभागातील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमात आरोग्य सहाय्यक प्रफुल्ल विलास केळसकर (केंद्र – पिसई) , आरोग्य सेविका जयश्री इराप्पा टिळे ( उपकेंद्र -खेर्डी ), श्री बापू गोविंद आग्रे (केंद्रप्रमुख, पिसई), सुरज संतोष क्षीरसागर (विशेष शिक्षक, पिसई केंद्र) तसेच आशा स्वयंसेविका सुचिता काटकर आणि योगिता सवणसकर उपस्थित होत्या.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार, लसीकरण, संसर्गजन्य आजारांपासून बचाव, पर्यावरण स्वच्छता आणि निरोगी जीवनशैली याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या अभियानाचा उद्देश प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम व निरोगी बनविणे हा असून त्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रितू मेहता मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचा संकल्प केला.








